IMG-LOGO
महाराष्ट्र

मुंडेविरोधील बलात्काराची तक्रार मागे

Saturday, Jan 23
IMG

मुंडे यांच्यावर रेणूने बलात्काराचा गंभीर आरोप केला होता. मुंडे यांच्याविरुद्ध तिने ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

मुंबई, दि. २३ जानेवारी  : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेण्यात आली आहे. कौटुंबिक कारणे आणि या प्रकरणाचे राजकारण होत असल्याने तक्रार मागे घेत असल्याचे ट्वीट रेणू शर्मा या महिलेने केले आहे.मुंडे यांच्यावर रेणूने बलात्काराचा गंभीर आरोप केला होता. मुंडे यांच्याविरुद्ध तिने ओशिवारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिले होते. मी मुंडे यांच्यावर लग्नाचे वचन आणि बलात्काराचा आरोप केला होता. माझी बहीण आणि मुंडे यांच्यात काही काळापासून तणाव निर्माण झाला असून न्यायालयात खटला सुरू झाल्याने मी मानसिक तणावाखाली होते; मात्र विरोधी पक्ष त्यांच्याविरूद्ध (मुंडे) जाताना पाहून मला वाटले, की मी मोठ्या राजकीय षडयंत्राचा बळी होत आहे. काही लोक माझ्या खांद्यावर बंदुका ठेवून त्या चालवत आहेत आणि हे सर्व चुकीचे आहे, असे रेणूने म्हटले आहे. लग्न आणि बलात्काराच्या आश्वासनाचा भंग करण्याची माझी कोणतीही तक्रार नाही किंवा कोणताही अनुचित फोटो आणि व्हिडिओ नाही. हे विधान मी संपूर्ण जबाबदारीने करीत आहे, असे तिने म्हटले आहे.सहका-याच्या बदनामीचे दुःख ’एखादी राजकीय व्यक्ती काम करते, तिला या क्षेत्रात त्यांना प्रचंड काम करावे लागते, कष्ट घ्यावे लागतात; पण असे जेवढे घडते, तेव्हा त्यांना एक क्षणात पायउतार व्हावे लागते, याचा सगळ्यांनी गांभीर्याने विचार करायला पाहिजे. बहुजन समाजतून पुढे आलेला एक सहकारी, तो बदनाम होतो ही बाब दुःखद आहे, असे सांगताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.तक्रारकर्त्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करातक्रारकर्त्यावर दबाव येऊ नये, यासाठी राजीनामा आवश्यक असतो, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुंडे यांच्यावर बलात्कार आरोप प्रकरणी तक्रार वापसी प्रकरणावर दिली आहे. त्यांच्या मते हा सेटिंग-फिटिंगने गंभीर विषय दाबण्याचा प्रयत्न तर झाला नाही. आता त्या महिलेवर खोटी तक्रार केल्याची कारवाई करा, असे मत त्यांनी व्यक्त केले.चंद्रकांतदादा संतापलेआम्ही वारंवार रेणू शर्माबाबत नव्हे, तर पीडिता करुणा शर्मा यांच्याबद्दल बोला असे सांगत होतो. मुंडे यांनी आपले संबंध असल्याचे तसेच त्यातून दोन मुले असल्याचे आणि प्रतिज्ञापत्रात ती दाखवली नाहीत हेदेखील मान्य केले. हे अनैतिक आणि बेकायदेशीर आहे. त्यामुळे आम्ही राजीनामा मागितला होता, असे चंद्रकांत पाटील यांनी या वेळी म्हटले. रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतली म्हणजे ते निर्दोष आहेत, त्यांना क्लीन चीट द्या, बदनामी झाली असे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अरे काय चाललेय काय? महाराष्ट्रातील नैतिकता संपली का? असे सवाल त्यांनी केले.

Share: