अकोले येथे दरवर्षी शिवरात्रीची यात्रा दोन दिवसांची असते आणि किमान चार ते पाच लाख भाविक यात्रेला गर्दी करीत असतात. तथापि सध्या कोरोनाने डोके वर काढले असल्याने या यात्रेवर नैसर्गिक संकट आले आहे.
अकोले, दि. २ मार्च : संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अकोल्याच्या अगस्ती आश्रमातील महाशिवरात्रीची (ता.11) मार्च ते (ता.12) मार्च या दोन दिवसांच्या काळात होणारी यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. ही माहिती अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, अॅड. के. डी. धुमाळ यांनी दिली. अकोले येथे दरवर्षी शिवरात्रीची यात्रा दोन दिवसांची असते आणि किमान चार ते पाच लाख भाविक यात्रेला गर्दी करीत असतात. तथापि सध्या कोरोनाने डोके वर काढले असल्याने या यात्रेवर नैसर्गिक संकट आले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व शासकीय निर्बंध लक्षात घेता यंदा ही यात्रा रद्द करण्यात आली असल्याचे धुमाळ यांनी सांगितले. या यात्रेसाठी मुंबई, पुणे, नगर, नाशिक, ठाणे या जिल्ह्याबरोबरच राज्याच्या कानाकोप-यातून भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. शिवाय मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागातील व्यापारी या यात्रेला आवर्जून आपले सामान विक्रीसाठी आणत असतात; मात्र यावर्षी तशी स्थिती नसल्याने व्यापार्यांनी व विक्रेत्यांनी आपली खेळणी, प्रसाद, रहाटगाडगे, पाळणे किंवा इतर कोणताही माल विक्रीस आणू नये, असे त्यांनी कळवले आहे. शिवाय यात्रेच्या दुस-या दिवशी होणारा राज्यव्यापी कुस्त्यांचा हगामादेखील रद्द करण्यात आला आहे. शासकीय नियमांच्या अधीन राहून अगस्ती आश्रमातील अगस्ती महाराजांची विधिवत पूजा अर्चा व दर्शन हे उपलब्ध करून दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.