नवी दिल्ली, दि.१३ ऑगस्ट : प्रामाणिक करदात्यांसाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कारण वेळेत कर भरणाऱ्या प्रामाणिक करदात्यांसाठी एक नवे व्यासपीठ केंद्र शासनाने तयार केले असून पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आलं. पारदर्शी कर आकारणी : प्रामाणिकतेचा सन्मान असे या व्यासपीठाचं नाव आहे. पारदर्शक करप्रणाली या नव्या व्यवस्थेचे लोकार्पण करण्यात आले असून आजपासून ती लागू होणार असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. देशातील प्रामाणिक करदाता देशाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका निभावतो. प्रामाणिक करदात्यासोबत देशाचाही विकास होत असतो. आज प्रत्येकाला शॉर्टकट योग्य नसल्याचे लक्षात येत आहे. चुकीचे मार्ग निवडणे योग्य नाही. ती वेळ, काळ निघून गेला आहे. देशभरात नवे बदल होत आहेत. या नव्या व्यासपीठामुळे नियमित कर भरणाऱ्यांच्या मनातील भीती दूर होईल, असे नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले. आपली आताची व्यवस्था आपण पारतंत्र्यात असताना तयार करण्यात आली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर थोडे थोडे बदल झाले पण मूळ ढाचा तसाच राहिला. करदाता हा राष्ट्रनिर्माणाचा आधारस्तंभ आहे.करदात्यांच्या संख्येत वाढ व्हायला हवी होती. ब्लॅक आणि व्हाईट पैशांचा उद्योग वाढला. इमानदारीने व्यापार करणाऱ्यांना प्रोत्साहित करण्याऐवजी निरुत्साह वाढवला.डझनभर करांच्या ऐवजी जीएसटी प्रणाली लागू करण्यात आली.कागदपत्रं आणि मॅन्युअलला फाटा देत ऑनलाईन व्यवस्था करण्यात आली.सोपी कर प्रणाली म्हणजे काय?देशात टॅक्स कमी करण्यात आला आहे. कॉर्पोरेट टॅक्सही कमी करण्यात आला आहे. टॅक्स प्रणाली सहज असावी. प्रत्येक करदात्याला सोयीची असावी. करदात्याला कोणताही त्रास होऊ नये. ही यंत्रणा फेसलेस म्हणजे करदाता कोण आणि अधिकारी कोण या गोष्टी गौण ठराव्यात.देशातल्या करदात्याचं आयुष्य सोपं आणि सुकर होतं, त्याची आगेकूच होते तेव्हा देशाचा विकास होतो, देश चांगल्या दिशेने वाटचाल करू लागतो.