पुणे, दि. १४ अॉगस्ट : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 'कोरोना' बाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणाबाबत समाधान व्यक्त करतानाच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करणे, मृत्यू दर कमी ठेवणे, चाचण्यांची संख्या वाढवून रुग्णांवर वेळीच उपचार करणे तसेच इतर आजार असणाऱ्या व्यक्तींना वेळीच ओळखून त्यांच्यावर उपचार आणि विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याच्या सूचना उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासनाला दिल्या. दरम्यान गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा (रक्तद्रव) थेरपी उपयुक्त ठरेल असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 'कोरोना'बाबतच्या उपाययोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनु गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य उपसंचालक संजय देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापुकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, डॉ. दिलीप कदम यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुणे व पिंपरी चिंचवड शहरात 'कोरोना' रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे ही समाधानाची बाब आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासोबतच्या उपाययोजनाबरोबरच कोरोनाबाधित रुग्णाला वेळेवर उपचार मिळतील याबाबत दक्षता घ्यावी. तसेच कोरोना विषाणूची भिती घालविण्यासाठी तसेच याविषयी जनसामान्यांमध्ये सतर्कता व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती होण्यासाठी छोट्या-छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या. कोरोना संसर्गातून गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग होत आहे. शासनाने ही सर्वात मोठी सुविधा सुरू केली आहे. प्लाझ्मा दान करण्याबाबत जनजागृती करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.'कोरोना'च्या संकटाशी आपण सर्व मिळून विविध माध्यमातून लढत आहोत. आपण ही लढाई नक्की जिंकू असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. प्रारंभी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी क्षेत्रनिहाय कोरोना बाधित रुग्ण, नमुना तपासणी प्रयोगशाळा, आठवडानिहाय कोरोना बाधित रुग्ण व मृत्यूचा तपशील, कोरोना मुक्त झालेले रुग्ण, संपर्क व्यक्ती शोधणे,क्षेत्रनिहाय प्रतिबंधित क्षेत्र, अनुमानित कोरोना रुग्ण व नियोजित बेड उपलब्धता, रुग्णवाहिका उपलब्धता याबाबतची सविस्तर माहिती दिली. तसेच जम्बो रुग्णालय उभारणीचे काम गतीने सुरू असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार व पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकाक्षेत्रात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.