भाजपा प्रदेश कार्यालयावरची काँग्रेसची निदर्शने फ्लॉपमुंबई, दि. १४ ऑगस्ट : आत्मनिर्भर भारत योजनेसह केंद्र सरकारच्या सर्वच योजनांबाबत खोटे बोलून काँग्रेस जनतेत संभ्रम पसरवत असून काँग्रेसचा हा खोटेपणा जनतेसमोर सर्व पातळीवर उघडा पाडला जाईल असे प्रतिपादन भाजपा मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी आज येथे केले.काँग्रेसच्या निदर्शनाना उत्तर देण्यासाठी भाजपा प्रदेश कार्यालयात मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या भाजपा कार्यकर्त्यांसमोर ते बोलत होते. यावेळी खा. गोपाळ शेट्टी, खा. मनोज कोटक, आ. प्रसाद लाड, आ. पराग अळवणी, आ. राम कदम, आ. मिहिर कोटेचा, आ. योगेश सागर, भाजपा मुंबई मनपा गटनेते प्रभाकर शिंदे, नगरसेवक भालचंद्र शिरसाठ, अतुल शाह यांच्या सोबत अनेक भाजपा नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र घोषणा करूनही काँग्रेस कार्यकर्ते मात्र भाजपा कार्यालयावर निदर्शने करण्यासाठी आलेच नाहीत.यावेळी बोलताना मंगलप्रभात लोढा यांनी पुढे सांगितले की काँग्रेसला वेळ पडल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल. काँग्रेस ने खोटेपणा सोडून सत्याची कास धरावी असे आवाहनही त्यांनी केले.तर खा. गोपाळ शेट्टी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, या महामारीच्या काळात विरोधी पक्षांनी जबाबदारीने वागले पाहिजे, मात्र काँग्रेस खोटे बोलून जनतेत संभ्रम पसरवत आहे. केंद्र सरकारच्या सगळ्या योजना उत्तम असून त्यांचा थेट लाभ जनतेला मिळत आहे. आ.प्रसाद लाड यावेळी बोलताना म्हणाले की काँग्रेस कार्यकर्ते केंद्राच्या योजनेबाबत सोशल मिडियावर स्वतःच्याच कार्यकर्त्यांना प्रश्न विचारत आहेत आणि त्यांचेच कार्यकर्ते त्या प्रश्नांना उत्तरे देत जणू जनतेतून उत्तरे आल्याचे भासवले जात आहे. काँग्रेसचा हा खोटेपणा भाजपाकडून उघडा पाडला जाईल असे ते म्हणाले.