भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुंबई दौरा येत्या दोन तीन दिवसांत होणार आहे.
शनिवार नंतर राज्यात महायुतीच्या सत्तास्थापनेचा प्रयत्न! मुंबई दि. ३० : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुंबई दौरा येत्या दोन तीन दिवसांत होणार आहे. मुंबईत होणाऱ्या भाजप आमदारांच्या बैठकीला शाह उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत महायुतीच्या सत्ता फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होणार असून भाजपचा शपथविधी ३नोव्हेंबरनंतरच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळाले तरी भाजपला गेल्या विधानसभेपेक्षा यंदा १७ जागा कमी मिळाल्या आहेत. शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करणे भाजपला शक्य नाही. त्यामुळे हीच वेळ साधत शिवसेनेने भाजपला युतीच्या फॉर्म्युल्याची आठवण करुन देत, मुख्यमंत्री पदावर आणि इतर महत्वाच्या पदावर दावा केला आहे. दरम्यान भाजप कडून १३ मंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव शिवसेनेला देण्यात आला असून त्याबाबत शिवसेनेच्या आमदारांची उद्या बैठक होत आहे. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यपलांना संयुक्तपणे सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी जाण्यासाठी दोन दिवसांचा वेळ भाजपने सेनेला दिला असून शुक्रवार पर्यंत याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.