IMG-LOGO
महाराष्ट्र

ठाकरे सरकारचा बहुमताचा ठराव विधानसभेत १६९ मतांनी मंजूर

Saturday, Nov 30
IMG

मुंबई दि. ३० : विधानसभेत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने १६९ विरूध्द शून्य मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. चार सदस्य त टस्थ राहिले तर मतमोजणीची घोषणा होताच भाजप आणि त्यांच्या सहयोगी सदस्यानी सभात्याग केला.

दुपारी दोन वाजता सभागृहाची बैठक प्रचंड घोषणाबाजीने सुरूवात झाली. त्यावेळी सदनात आलेल्या मुख्यमंत्री ठाकरे यानी विरोधी बाकांवर येवून सर्व सदस्यांचे स्वागत केले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले त्यांचेही त्यानी हात मिळवून स्वागत केले. त्यावेळी खाली झुकून फडणवीस यांनी त्यांच्या कानात काही सांगण्याचा प्रयत्न केला.  सर्वप्रथम अस्थायी अध्यक्षांच्या निवडीला आक्षेप घेत विरोधीपक्षांच्या वतीने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचे अधिवेशन नियमबाह्य आणि असंवैधानिक पद्धतीने बोलाविण्यात आले असल्याचे सांगितले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची आणि संसदीय प्रथांची संपूर्ण पायमल्ली या सरकारने केली असे ते म्हणाले. फडणवीस म्हणाले की, २७ नोव्हेंबर रोजी जे अधिवेशन झाले, ते ‘वंदे मातरम्‘ने सुरू झाले आणि राष्ट्रगीताने सांगता झाली. याचा अर्थ ते अधिवेशन संस्थागित झाले होते. नव्याने अधिवेशन बोलावण्यासाठी राज्यपालांकडून समन्स असावा लागतो. मध्यरात्री १ वाजता हे कळविण्यात येते. यामागे नेमका उद्देश काय? ते म्हणाले की, नूतन अध्यक्षांची निवड होईस्तोवर हंगामी अध्यक्ष हे कायम राहत असतात. पण या सरकारने त्यातही बदल केला.  नवीन हंगामी अध्यक्ष आणले गेले. देशाच्या इतिहासात असे आजवर कधी घडले नाही. संविधानाची पूर्णतः पायमल्ली येथेही करण्यात आली. अध्यक्षांची निवड झाल्याशिवाय विश्वासमत कधीही मांडण्यात आलेले नाही. हा पराक्रम सुद्धा या सरकारने केला. भारताच्या इतिहासात हे प्रथमच घडले. नियमबाह्य पद्धतीने सभागृह चालविण्याचा आणि दडपशाहीचा मी निषेध करतो असे ते म्हणाले. नवीन अधिवेशनाची सुरुवात वंदे मातरम् ने व्हायला हवी होती. त्याशिवाय अधिवेशन सुरू होऊ शकत नाही. आम्हाला रात्री एक वाजता अधिवेशनाबाबत निरोप आले. आमचे सदस्य पोहचू शकू नये म्हणून आम्हाला रात्री एक वाजता कळवलं का? हे अधिवेशन संविधानानुसार होत नाहीये, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.             त्यानंतर फडणवीस यांचे आक्षेप फेटाळून लावताना हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील म्हणाले की, या सभागृहात अधिवेशन बोलवल्यानंतर, संस्थगित झाली.  त्यानंतर सात दिवसाच्या आत सभागृह बोलवत येते. त्यामुळे राज्यपालांनी शपथविधी झाला तेव्हा काल राज्यपालांनी परवानगी दिल्यानेच हे अधिवेशन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे हे अधिवेशन कायदेशीर आहे, असे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. आणि मुद्दा फेटाळून लावतो, असे त्यांनी सांगितले.  त्यानंतर भाजपचे सदस्य वेलमध्ये उतरुन गोंधळ सुरु केला. दादागिरी नहीं चलेगी, यासारख्या घोषणा देत भाजप सदस्यांनी गदारोळ केला. या गोंधळातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांचा परिचय करुन दिला.       गोंधळातच अध्यक्षांनी पुढचे कामकाज पुकारले त्यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यानी बहुमताचा प्रस्ताव मांडला त्याला राष्ट्रवादीच्या नबाब मलिक आणि शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी समर्थन दिले, त्यानंतर जयंत पाटील यांनी देखील या प्रस्तावाला समर्थन असल्याचे सांगितले. दिलीप वळसे पाटील यानी गोंधळातच प्रस्ताव मताला टाकला त्याला विरोधी सदस्यांनी पोलची मागणी केली मात्र पोलची प्रक्रीया सुरू करण्यात येत असताना विरोधी सदस्यानी सभागृहातून काढता पाय घेतला. त्यानंतर अध्यक्षांनी मतदानाची प्रक्रीया समजावून सांगताना सदस्यांना त्यांचे नाव आणि क्रमांक पुकारण्याची सूचना केली. १४५ क्रमांकाचे आमदार म्हणून पारनेरचे निलेश लंके यांनी नाव घेताच बहुमताचा आकडा पूर्ण झाल्याचा आनंद सदस्यांनी व्यक्त केला. त्यावेळी अदित्य ठाकरे यांनी मागच्या बाकावरूनच मुख्यमंत्री उध्दव यांना हस्तांदोलन करून अभिनंदन केले. यावेळी महाविकास आघाडीला १६९ सदस्यांचा  पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. या प्रस्तावाच्या विरोधात शून्य सदस्यांनी मतदान केले. चार सदस्य तटस्थ राहिले. त्यामध्ये मनसे एम आयएम आणि माकपचे सदस्य होते. या बहुमताच्या चाचणीनंतर महाविकास आघाडीच्या सरकारवर शिक्कामोर्तब झाले आहे.

Share: