आजच्या विद्यार्थ्यांसाठी समर्थांचे विचार पोषक वातावरणनिर्मिती करण्यात मोलाची भूमिका पार पाडू शकतात. त्यांच्या विचारांची जोड विद्यार्थी आणि त्यांचा व्यक्तिमत्व विकास करण्यास लागल्यास आयुष्य यशस्वी बनू शकते असे प्रतिपादन प्रमुख वक्त्या डॉ विनिता परांजपे यांनी केले.
आजच्या विद्यार्थ्यांसाठी समर्थांचे विचार पोषक वातावरणनिर्मिती करण्यात मोलाची भूमिका पार पाडू शकतात. त्यांच्या विचारांची जोड विद्यार्थी आणि त्यांचा व्यक्तिमत्व विकास करण्यास लागल्यास आयुष्य यशस्वी बनू शकते असे प्रतिपादन प्रमुख वक्त्या डॉ विनिता परांजपे यांनी केले. निमित्त होते मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळाच्या भोसला सैनिकी कनिष्ठ महाविद्यालयात आयोजिलेल्या समर्थ रामदास - विचार आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावरील जाहीर व्याख्यानाचे. त्याप्रसंगी डॉ विनिता परांजपे प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ यु वाय कुलकर्णी आणि उपप्राचार्य एस डी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर प्रा. एम .एन.उपासनी, प्रा.ममता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रमुख वक्त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी पुढे बोलतांना डॉ परांजपे म्हणाल्या कि, भक्ती केल्यामुळे देव निश्चितपणे प्राप्त होतो असे त्यांनी दासबोधाच्या सुरुवातीलाच सांगितले आहे. त्यांनी स्वतः १२ वर्षे नामस्मरण भक्ती केली व त्याचा प्रसार केला. परमार्थाशिवाय केलेला प्रपंच 'भिकारी' आहे. ज्या घरामध्ये रामनाम नाही ते घर सोडून खुशाल अरण्यात निघून जावे असे समर्थ निक्षून सांगतात. देवाचे वैभव वाढवावे, नाना उत्सव करावे असे त्यांचे मत होते. समर्थांनी प्रत्ययाचे ज्ञान सर्वश्रेष्ठ मानले. आज आपल्या जीवनात अपयश आणि दु:ख दिसत असेल, तर त्याला आपले अधीर आणि उतावीळ मन कारणीभूत आहे. बहुसंख्य लोक आज सुख, आंनद, यश, कीर्ती, ऐश्वर्य, अधिकार मिळवण्यासाठी अधीर आणि उतावीळ झाले आहेत. परंतु त्यासाठी शांतपणे आणि सातत्याने कराव्या लागणाऱ्या परिश्रमाचा अभाव दिसून येत आहे. आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीत विद्या, कला अथवा अन्य कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी बारा वर्षाचे परिश्रम आवश्यक मानले आहेत. या सतत केलेल्या प्रयत्नांनाच ‘तप’ असे म्हटले जाते. आपला प्राचीन इतिहास वाचला म्हणजे खर्या धैर्याची कल्पना येऊ शकेल. जगातील सर्व देशात आणि सर्व काळात जे विद्वान, ज्ञानी, ध्येयवादी, यशस्वी संत, महंत, कलाकार वीर पुरुष होऊन गेले त्यांनी जीवनातील धैर्याची पुंजी कधीही संपू दिली नाही. म्हणूनच परिस्थितीवर मात करुन ते यशस्वी झाले. अंत:करणात श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र कर्तव्य, ध्येय, उपासना या गोष्टी जगात सर्वश्रेष्ठ आहेत. तनाने, मनाने, धनाने आणि प्राणपणाने मला त्या पूर्ण केल्या पाहिजेत, अशी ज्याची दृढ श्रद्धा असेल त्याच्याच अंत:करणात धैर्य उत्पन्न होईल. साडेतीनशे वर्षापूर्वी, राजकीय राजवटीत जेव्हा हिंदुस्थानी जनता भयभीत झाली होती, तेव्हा श्री समर्थांनी आपले बाहू उभारून खणखणीत वाणीने लोकांना सांगितले – धिर्धरा धिर्धरा तकवा । हडबडूं गडबडूं नका ।केल्याने होत आहे रे । आधी केलेचि पाहिजे ॥ समर्थांची शिकवण कशी व्यावहारिक शहाणपणाची, सावधानतेची, आत्मविश्वास उत्पन्न करणारी, रोखठोक आणि राजकारणी स्वरूपाचीही होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस पुराणिक यांनी केले. प्रास्ताविक प्रा ममता कुलकर्णी यांनी केले. आभार प्रा मैथिली दत्ते यांनी मानले. ह्रिदयंती या विद्यार्थिनीने वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाला ११वी कला आणि वाणिज्य शाखेचे विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित होते.