गेले ४ महिने कोरोनाने देशासह जगभरात थैमान घातले आहे. याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झालेला दिसत आहे.
नवी दिल्ली, दि. १० ऑगस्ट : गेले ४ महिने कोरोनाने देशासह जगभरात थैमान घातले आहे. याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झालेला दिसत आहे. शैक्षणिक क्षेत्रावर देखील या रोगाचा मोठा विपरीत परिणाम झाला असून एप्रिल-मे हे परीक्षांचे हंगाम असलेले महिनेच या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी करण्यात आलेल्या टाळेबंदीमध्ये गेले आहेत. महाराष्ट्रातून युवासेना आणि देशभरातून अन्य ३१ याचिका याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आल्या आहेत. तर, याचाच विचार करता, अनेक राज्यांच्या सरकारांनी विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्याचे जाहीर केले होते. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच युजीसीने विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. त्यानुसार, देशभरातील विद्यापीठांना ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची सक्ती केली आहे. महाराष्ट्र, पंजाब, दिल्लीसह इतर १३ राज्यांनी या कोरोना काळात विद्यार्थ्यांची व शिक्षकांची सुरक्षितता परीक्षा घेण्यास विरोध केला आहे. यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षा घेण्याची सक्ती केली आहे. मात्र केवळ दोन राज्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे, असे एसजी तुषार मेहता म्हणाले. अन्य राज्यांची प्रतिज्ञापत्रे बाकी असल्याचे विचारात घेऊन सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी मेहता यांनी केली. पुढील सुनावणी १४ ऑगस्ट रोजी होणार आहे.