देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता शाळा पुन्हा सुरु करण्याचा विचार केंद्र सरकार करतंय.
नवी दिल्ली दि ०७ ऑगस्ट : देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता शाळा पुन्हा सुरु करण्याचा विचार केंद्र सरकार करतंय. यासाठी केंद्र सरकारने योजनाही आखली आहे. 1 सप्टेंबर ते 14 सप्टेंबरदरम्यान टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा केंद्राचा विचार आहे.कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता केंद्र सरकारकडून लॉकडाउनची घोषणा कऱण्यात आली होती आणि शाळा बंद केल्या होत्या. 23 मार्चपासून संपूर्ण देशभरातील शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद आहेत. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडलेल्या बैठकीत शाळा सुरु करण्याच्या योजनेवर चर्चा झाली. 31 ऑगस्ट रोजी जाहीर होणाऱ्या अनलॉकच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये याचा समावेश असण्याची शक्यता आहे. मात्र विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत कसं आणि कधी आणायचं हा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारांकडे असणार आहे.शाळा सुरु करण्याच्या सरकारच्या योजनेप्रमाणे पहिल्या 15 दिवसांमध्ये 10 आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यास सांगितलं जाऊ शकतं. यानंतर वेळमर्यादेत सहावी ते नववीचे वर्ग सुरु केले जाण्याची शक्यता आहे. प्रत्येक इयत्तेतील तुकडीला दिवस ठरवून दिला जाईल. त्याचप्रमाणे शाळा आणि वर्ग सॅनिटाइज करणं अनिवार्य असणार आहे.