देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. आता केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे.
नवी दिल्ली : दि ०९ ऑगस्ट : देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. आता केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. शनिवारी (८ ऑगस्ट) मेघवाल यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कधी एकदा कोरोनावरील लस येते याची प्रतीक्षा संपूर्ण जगाला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर कोरोनावरील औषध आणि उपायांचे विविध दावे कोणा ना कोणाकडून सतत केले जातात. विशेष म्हणजे अर्जुन मेघवाल यांनी देखील असाच एक अजब दावा केला होता. 'पापड खाल्ल्याने कोरोना बरा होतो', असा दावा अर्जुन मेघवाल यांनी काहीच दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर त्यांच्यावर मोठी टीका देखील झाली होती.मेघवाल यांनी स्वतः ट्विटरवरून आपल्याला कोरोना झाल्याचं सांगितलं आहे. यावेळेस मेघवाल म्हणाले की, कोरोनाची लक्षणं आढळून आल्यानंतर कोरोनाची चाचणी केली असता टेस्ट निगेटीव्ह आली होती. मात्र दुसरी टेस्ट केली असता माझी टेस्ट पाॅझिटीव्ह आली आहे.तसेच माझी प्रकृती उत्तम असून डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार एम्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल आहे. मागील काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या व्यक्तींनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, अशी विनंतीही मेघवाल यांनी यावेळेस व्यक्त केली आहे.