IMG-LOGO
राष्ट्रीय

राजस्थानमध्ये आता काँग्रेसपाठोपाठ भाजपलाही फुटीच्या राजकारणाची भीती

Saturday, Aug 08
IMG

राजस्थानमध्ये आता काँग्रेसपाठोपाठ भाजपलाही फुटीच्या राजकारणाची भीती वाटू लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

जयपूर : दि ०८ ऑगस्ट :  राजस्थानमध्ये आता काँग्रेसपाठोपाठ भाजपलाही फुटीच्या राजकारणाची भीती वाटू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षाने १२ आमदारांपाठोपाठ शनिवारी आणखी सहा आमदारांना गुजरातमध्ये हलविले असून, राज्यात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या सत्तासंर्षाला यामुळे नवे वळण मिळाले आहे.राजस्थान विधानसभेचे अधिवेशन १४ ऑगस्टपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमिवर भाजपने शुक्रवारी जालोर, सिरोही, उदयपूरमधील १२ आमदारांना अहमदाबाद शहरातील एका रिसॉर्टवर पाठविले. यानंतर शनिवारी आणखी सहा आमदारांना खासगी विमानाने पोरबंदर येथे हलविण्यात आले असून, यात निर्मल कुमावत, गोपीचंद मीणा, जब्बरसिंह सांखला, धर्मवीर मोची, गोपाल लालशर्मा आणि गुरुदीप सिंह शाहपिनी यांचा समावेश आहे.दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी आमदारांना हलविण्याबाबतचे वृत्त फेटाळून लावले आहे. ते म्हणाले की, सर्व आमदार पक्षाच्या पाठिशी असून, संशयाला कुठेही वाव नाही. उलट काँग्रेस सरकारमधील काहीजण सोशल मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे अफवा पसरवून भाजप नेत्यांविषयी संभ्रम निर्माण करीत आहेत, असा आरोपही त्यांनी या वेळी केला. लवकरच पक्षाची बैठक घेण्यात येणार असून, सर्व आमदार त्यात उपस्थित असतील, अशी माहितीही पुनिया यांनी दिली.

Share: