माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या निधनाने संवेदनशील जनसेवक हरपला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, माजी राज्यमंत्री दिघोळे यांनी 1985 ते 1999 या कालावधीत तीन वेळेस आमदार म्हणून सामान्य जनतेचे प्रश्न प्रभावीपणे सभागृहात मांडले. युती सरकारच्या काळात ऊर्जा आणि ग्रामविकास खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम केले. त्यांनी नाशिक येथील व्ही.एन. नाईक संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यांचे शैक्षणिक, राजकीय, सहकार आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य नेहमीच स्मरणात राहील.राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी- छगन भुजबळमाजी राज्यमंत्री, व्ही. एन.नाईक शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तुकाराम दिघोळे यांच्या निधनाने जिल्ह्यातील राजकीय,सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याच्या शोक भावना राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहे.छगन भुजबळ यांनी शोक संदेशात म्हटले आहे की,दिघोळे यांनी १९८५ ते १९९९या सलग तीन पंचवार्षिक निवडणुकीत सिन्नर विधानसभा निवडणुकीत विजय मिळवित तालुक्यात सलग तीन वेळा आमदार होणारे ते एकमेव नेते होते.युती शासनाच्या काळात त्यांनी साडेतीन वर्षे ऊर्जा आणि ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून यशस्वीरित्या काम पाहिले होते. त्यांनी नाशिक साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष,शिखर बँकेचे संचालक, राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून देखील पदे भूषविली होती. सिन्नरच्या विकासात त्यांचे मोठे योगदान होते. माळेगाव औद्योगिक वसाहतीचा चेहरा मोहरा बदलून हजारो युवकांना रोजगार मिळवून देण्यात त्यांची भूमिका मोलाची होती. दारणा नदीपात्रातून सिन्नर शहरासाठी पाणीयोजना राबविणे आणि कडवा धरणाचे पाणी पूर्व भागात आणण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले होते. त्यांच्या निधनाने सिन्नर तालुका एका ज्येष्ठ मार्गदर्शकाला कायमचा मुकला आहे.दिघोळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय त्यांच्या दुःखात सहभागी असुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे छगन भुजबळ यांनी शोक संदेशात म्हटले आहे.