IMG-LOGO
शिक्षण

वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचा निर्णय

Wednesday, Aug 12
IMG

शासन निर्णय 20 सप्टेंबर 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आला असून कार्योत्तर मान्यता देण्यात आली.

मुंबई, दि.१२ ऑगस्ट : सन २०१९-२० मध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता (एसईबीसी) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) या संवर्गाला आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशकारिता आरक्षण लागू करण्यात आले होते. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील काही विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय / दंत महाविद्यालय येथे प्रवेश मिळाला नाही अशा काही खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती मिळणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले आहेत.सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात खुल्या प्रवर्गातील काही विद्यार्थ्यांना शासकीय महाविद्यालयांऐवजी खासगी विनाअनुदानीत महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला. अशा 112 बाधित विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 7 कोटी 49 लाख 38 हजार 600 रुपये प्रतिपूर्ती देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठरले. या संदर्भातील शासन निर्णय 20 सप्टेंबर 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आला असून कार्योत्तर मान्यता देण्यात आली. एकूण 33 कोटी 6 लाख 23 हजार 400 इतकी प्रतिपूर्तीची एकूण रक्कम होणार आहे.  याचा लाभ 6 वैद्यकीय / दंत पदव्युत्तर 3 वर्षे कालावधीच्या पदवीसाठी तसेच 4.5 वर्षे कालावधीच्या 106 पदवी विद्यार्थ्यांना होणार आहे.वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढराज्यातील 18 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व 3 दंत महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.यानुसार कनिष्ठ निवासी व वरिष्ठ निवासी यांच्या सध्याच्या विद्यावेतनात 10 हजार रुपये वाढ याच महिन्यापासून करण्याचे ठरले.  यामुळे 29 कोटी 67 लक्ष 60 हजार इतका वाढीव बोजा पडेल.सेंट्रल मार्ड संघटनेने निवासी डॉक्टर 24 तास सेवा देत असल्याचे निदर्शनास आणले आहे.  राज्यात कोरोनामुळे निवासी डॉक्टर अहोरात्र रुग्णसेवा देत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.  सध्या महाराष्ट्रात प्रतिमहा 54 हजार, गुजरात मध्ये 63 हजार, बिहारमध्ये 65 हजार आणि उत्तर प्रदेशात 78 हजार एवढे विद्यावेतन देण्यात येते.महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांना विद्यावेतनात वाढ केल्याचा निर्णय झाल्यामुळे कनिष्ठ निवासी आणि वरिष्ठ निवासी यांचे सुधारित विद्यावेतन हे 64 हजार 551 पासून 71 हजार 247 रुपयांपर्यंत होईल. तर दंत पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे सुधारित विद्यावेतन 49 हजार 648 पासून 55 हजार 258 इतके होईल.

Share: