पुष्कर म्हणजे डान्स, हे समीकरण कलाकार पुष्कर जोग, याने 'ती अँड ती' या सिनेमातून पुसून टाकलं. निर्माता आणि अभिनेता अशा दुहेरी भूमिका उत्तमरीत्या पेलणाऱ्या, यंग, स्मार्ट आणि लाडक्या कलाकाराशी, 'झी टॉकीज'वर होणाऱ्या, चित्रपटाच्या 'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर'च्या निमित्ताने मारलेल्या या गप्पा..
पुष्कर म्हणजे डान्स, हे समीकरण कलाकार पुष्कर जोग, याने 'ती अँड ती' या सिनेमातून पुसून टाकलं. निर्माता आणि अभिनेता अशा दुहेरी भूमिका उत्तमरीत्या पेलणाऱ्या, यंग, स्मार्ट आणि लाडक्या कलाकाराशी, 'झी टॉकीज'वर होणाऱ्या, चित्रपटाच्या 'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर'च्या निमित्ताने मारलेल्या या गप्पा...१. चित्रपटातील भूमिका आणि खऱ्या जीवनातील पुष्कर यांच्यात काही साम्य आहे का?हे पात्र अगदी माझ्यासारखंच निरागस आहे. विराजस कुलकर्णी यांनी हा चित्रपट लिहिला आहे. ही भूमिका लिहीत असतांना, मला डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी लिखाण केलं आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवनात कशी तारांबळ उडते ते या चित्रपटात पाहायला मिळतं. हनीमूनला गेलेला असतांना, त्याला त्याची जुनी गर्लफ्रेंड भेटते आणि तो सगळ्या गोष्टींमध्ये कसा गुंतत जातो, हा या चित्रपटाचा गाभा आहे. तो कठीण परिस्थितीत सापडण्याला त्याचा निरागसपणा कारणीभूत आहे.पुष्कर जोग म्हणजे डान्स, असं एक समीकरण प्रेक्षकांच्या मनात आहे. पण, या चित्रपटासाठी मला, 'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्डस'मध्ये सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे. मला, अभिनेता म्हणून सर्वांनी स्वीकारलं असल्यामुळे, माझ्यासाठी ही भूमिका फार महत्त्वाची आहे. २. चित्रीकरणादरम्यानची एखादी आठवण आम्हाला सांगशील का?लंडनपासून ३-४ तासांच्या अंतरावर एका समुद्रकिनाऱ्यावर एक प्रसंग शूट करायचा होता. माझा आणि सोनालीचा हा प्रसंग चित्रित होत असतांना, तिथे खूप थंडी होती. संपूर्ण युनिट या थंडीत कुडकुडत होतं. त्याचवेळी तिथे वादळ आल्यामुळे, ड्रोन वापरणं शक्य होत नव्हतं. चित्रीकरण करणं, हे आमच्यासाठी मोठं आव्हान होतं. थंडीने कहर केला होता असं म्हणायलाही हरकत नाही. हा अनुभव कायमचा स्मरणात राहील. ३. या चित्रपटाच्या निमित्ताने निर्मिती आणि अभिनय अशा दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तू पेलल्या आहेस. ही गोष्ट किती आव्हानात्मक असते?चित्रपट निर्मिती हे माझं आवडतं काम आहे. जबाबदारी आणि हक्क या दोन्ही गोष्टी यानिमित्ताने अनुभवता येतात. निर्मितीचा तो आनंद माझ्यासाठी मोलाचा आहे. शिवाय, मला पैसे वाचवायला आवडतं. त्यामुळे अभिनयाची जबाबदारी सुद्धा मीच स्वीकारतो. विनोदाचा भाग निराळा, पण एक निर्माता म्हणून, आपल्याला एखादी भूमिका कशी असायला हवी हे योग्यप्रकारे माहीत असतं. त्यामुळे आपणच भूमिका करणं श्रेयस्कर ठरतं. ४. परदेशात चित्रीकरण करण्याचा अनुभव कसा होता?परदेशात चित्रीकरण करणं, ही गोष्ट नक्कीच अवघड असते. पैशांची जुळवाजुळव करणं, ओळखीचा वापर करून घेणं, ही आव्हानं मोठी असतात. ही गोष्ट मला जमली याचा आनंद आहे. मराठी चित्रपटाचे चित्रीकरण परदेशात केलेले असल्याने, तो चित्रपट बघताना सुद्धा मजा येते.