भाजपाचे नेते व खासदार नारायण राणे हे पत्रकार परिषद घेऊन आपले परखड मत व्यक्त करत महाविकास आघाडी व शिवसेनेवर निशाणा साधताना दिसतात.
जळगाव : दि ०९ ऑगस्ट : भाजपाचे नेते व खासदार नारायण राणे हे पत्रकार परिषद घेऊन आपले परखड मत व्यक्त करत महाविकास आघाडी व शिवसेनेवर निशाणा साधताना दिसतात. मग, ते सामनाच्या मुलाखतीबाबत असो, कोरोनाच्या स्थितीवरून असो वा सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी असो. त्यांच्यासोबतच त्यांचे दोन्ही पुत्र आमदार नितेश राणे व माजी खासदार निलेश राणे हे देखील ठाकरे सरकारवर हल्लाबोल करताना दिसत आहेत.यावर आता शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांना एका खाजगी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने नारायण राणेंसंबंधी प्रश्न विचारला असता त्यांनी, ‘भाजपमध्ये दाखल झालेले नारायण राणे यांना आता कोणतेही काम उरले नाही. त्यांच्या पक्षातही त्यांना काही काम दिले जात नाही. त्यामुळे ते एक सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत’, अशी खोचक टीका गुलाबराव पाटलांनी केली.काल नारायण राणेंनी नाणार प्रकल्पावरुनही सेनेवर टीका केली होती. नाणार प्रकल्प हा शिवसेनेच्या कमवण्याचे साधन आहे, अशी टीका राणेंनी केली होती. त्यांच्या या टीकेचा समाचार घेत गुलाबराव पाटलांनी पलटवार केला. ‘नारायण राणे हे शिवसेनेत असताना मुख्यमंत्री होते. शिवसेनेनं त्यांना खूप काही दिले आहे. पण, त्यांनी कोकणासाठी काहीही केले नाही. त्यामुळे त्यांनी कोकणासाठी कुणी काय केले, यावर तर बोलूच नये,निव्वळ प्रसिद्धीसाठी ते वक्तव्य करत असतात’, असा टोलाही पाटलांनी लगावला.