शिवसेना विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड निवड झाली आहे. दरम्यान याआधी आदित्य ठाकरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती.
मुंबई : शिवसेना विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड निवड झाली आहे. दरम्यान याआधी आदित्य ठाकरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. परंतु गटनेते पदाचा अनुभव, राजकीय अभ्यास, पक्षातलं स्थान लक्षात घेऊन एकनाथ शिंदेच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. शिवसेना आमदारांच्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव सुचवले आहे. आदित्य ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर विधीमंडळ नेतेपद स्वीकारणार का याकडे लक्ष होतं. पण आता एकनाथ शिंदे यांची वर्णी लागली आहे. शिवसेना आमदारांची बैठक संपल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत नव्या नेत्याच्या नावाची घोषणा करणार आहेत. दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळपक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची बिनविरोध निवड झाली आहे. विधिमंडळ पक्षाची बैठक काल मुंबईत पक्षाचे केंद्रीय निरिक्षक नरेंद्रसिंग तोमर यांच्या उपस्थितीत झाली. चंद्रकांत पाटील यांनी पक्षनेतेपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या निवडीमुळे आता फडणविसच मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाचे दावेदार असतील यावर शिक्कामोर्तब झालं आहे. तसेच काल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधिमंडळ नेत्याची निवड करण्यात आली. यावेळी अजित पवार यांची विधिमंडळ नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. यावेळी पक्षाचे सर्व नुतन आमदार उपस्थित होते.यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला , नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड , धनंजय मुंडे , हसन मुश्रीफ यांनी अनुमोदन दिलं.