विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर बोलताना मुख्यमंत्री व्ही नारायणसामी भावूक झाले. त्यांनी आपल्या सरकारच्या कार्यकाळातील आव्हाने सदनात मांडली.
पुदुच्चेरी, दि. २३ फेब्रुवारी : केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीत काँग्रेस-डीएमके आघाडीचे सरकार कोसळले. विधानसभेत व्ही नारायणसामी सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले. यानंतर मुख्यमंत्री नारायणसामी यांनी आपला राजीनामा नव्या नायब राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांच्याकडे सोपवला आहे. विधानसभेत चर्चेदरम्यान मुख्यमंत्री व्ही नारायणसामी यांनी बहुमताचा केलेला दावा फोल ठरला. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावादरम्यान काँग्रेस आणि डीएमकेच्या आमदारांनी ’वॉक आऊट’ करत सदनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्याची घोषणा विधानसभा अध्यक्षांकडून करण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे, येत्या काही महिन्यांत पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ या चार राज्यांसोबतच पुद्दुचेरीमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधीच व्ही नारायणसामी सरकार कोसळले.विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर बोलताना मुख्यमंत्री व्ही नारायणसामी भावूक झाले. त्यांनी आपल्या सरकारच्या कार्यकाळातील आव्हाने सदनात मांडली. सरकार स्थापन केल्यानंतर आम्ही शेतक-यांचे सहकारी कृषी कर्ज माफ केले. छोट्या शेतक-यांसाठी पंतप्रधान मोदी सहा हजार रुपये देत होते, तर आम्ही 37,500 रुपये शेतकर्यांना दिले, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी नायब राज्यपाल किरण बेदी यांनी आम्हाला थोपवण्याचा खूप प्रयत्न केला; परंतु आम्ही जनतेच्या हितासाठी काम करत राहिलो, असेही त्यांनी या वेळी म्हटले.काँग्रेसने 2016 मधील निवडणुकीत 15 जागांवर विजय मिळवला होता. डीएमकेच्या तीन आमदारांनी काँग्रेसला समर्थन जाहीर केले होतं. यातील डीएमकेच्या आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एका आमदाराने रविवारी राजीनामा दिला. त्यानंतर नारायणसामी सरकारवर बहुमत सिद्ध करण्याचा दबाव वाढला होता.