पूजा चव्हाण प्रकरणापासून ते सचिन वाझे प्रकरणापर्यंत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती; पण विरोधकांचा हल्ला परतवून लावण्यात अनिल देशमुख अपयशी ठरले आहेत.
पवार-राऊत बैठकीत चर्चा? विरोधकांना उत्तर देण्याची व्यूहनीतीनवी दिल्ली, दि. १६ मार्च : सचिन वाझे प्रकरणाने महाराष्ट्र सरकारची कोंडी सुरू झालेली असतानाच आता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जोर बैठका सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक झाली. आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेही पवारांच्या भेटीसाठी दिल्लीत आले आहेत. खासदार संजय राऊत यांनीसुद्धा पवार यांची भेट घेऊन तब्बल अर्धा तास चर्चा केली. या भेटीत एकूण पाच मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबईच्या पोलिस आयुक्तांची उचलबांगडी होण्यासह अन्य विषयांवर या वेळी चर्चा झाल्यचे समजते. पूजा चव्हाण प्रकरणापासून ते सचिन वाझे प्रकरणापर्यंत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती; पण विरोधकांचा हल्ला परतवून लावण्यात अनिल देशमुख अपयशी ठरले आहेत. आता वाझे यांना अटक झाल्याने विरोधकांनी थेट देशमुख यांचा राजीनामा मागितला आहे. त्यामुळे राऊत आणि पवार यांच्या भेटीत गृहमंत्री बदलण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गृहमंत्री बदलल्यास विरोधकांकडून होणारी टीका थोपवता येईल आणि वाझे प्रकरणावरून सुरू असलेले रणकंदनही थांबेल या हेतूने राऊत-पवार यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. या वेळी अजित पवार किंवा जयंत पाटील यांच्याकडे गृहखाते देण्याबाबतही चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.या वेळी मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्यावरही चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. या बैठकीत परमबीर सिंह यांच्या जागी रजनीश सेठ यांना पोलिस आयुक्तपदी नियुक्त करण्यावरही चर्चा झाली; पोलिस आयुक्त बदलल्यास पोलिस दलाचे मनोबल खच्ची होईल का? राजकीय नेत्यांना वाचवून अधिकार्यांचा बळी दिल्याचा मेसेज तर जाणार नाही ना, यावरही खल झाला. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचमध्येही साफसफाई करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. गुन्हे अन्वेषण विभागामध्ये अनुभवी आणि स्वच्छ अधिकार्याला या खात्यात आणण्यावरही चर्चा झाली असून काही नावांवरही चर्चा झाल्याचे समजते. विरोधकांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. भाजप खासदार नारायण राणे आणि खासदार नवनीत राणा यांनी गृहमंत्र्यांना तसे पत्रही दिले आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते का? त्याची कितपत शक्यता आहे आणि पुढची रणनीती काय असावी? याबाबतही चर्चा झाली असावी. अँटालिया प्रकरण एनआएकडे असून या प्रकरणी वाझे यांना अटक करण्यात आली आहे; परंतु मनसुख हिरेन हेसुद्धा अँटालिया प्रकरणाशी संबंधित होते. त्यामुळे हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणाचा तपासही एनआयए करू शकतात. या संभाव्य शक्यतेच्या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.रजनीश सेठ-देशमुख यांच्यात खलबतेदिल्लीतील चर्चेनंतर मुंबईत गृहमंत्री अनिल देशमुख आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी रजनीश सेठ यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. सेठ यांचे नाव मुंबईच्या पोलिस आयुक्तपदासाठी आघाडीवर असून देशमुख आणि सेठ यांच्यातील चर्चेला त्यामुळे महत्व आले आहे.