लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी केलेल्या चीनने आता आणखी एक आगळीक केली आहे. चीनने भारताच्या अरुणाचल प्रदेशमध्ये एक नवीन गाव वसवले असून त्यात जवळपास 101 घरे आहेत.
अरुणाचल प्रदेशमध्ये चीनने वसवले गावबीजिंग/ नवी दिल्ली, दि. १८ जानेवारी : लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी केलेल्या चीनने आता आणखी एक आगळीक केली आहे. चीनने भारताच्या अरुणाचल प्रदेशमध्ये एक नवीन गाव वसवले असून त्यात जवळपास 101 घरे आहेत. धक्कादायक म्हणजे हे गाव सीमारेषेपासून साडेचार किलोमीटर आत अंतरावर वसवले आहे.चीनच्या विस्तारवादी भूमिकेमुळे भारतासह इतर शेजारी देशही त्रस्त आहेत. लडाखमध्ये भारत-चीनच्या सैन्यात हिंसक संघर्षही झाला. त्यानंतर लडाखमधील तणाव निवळण्यासाठी दोन्ही बाजूने लष्करी चर्चा सुरू आहेत. दुस-या बाजूला अरुणाचल प्रदेशमध्ये चीनने आगळीक केली आहे. चीनने हे गाव सुबनशिरी जिल्ह्यातील त्सारी चू नदीच्या किना-याजवळ वसवले आहे. एका सॅटेलाइट फोटोमधून याचा गौप्यस्फोट झाला आहे. या भागावर भारत आणि चीनचा दावा असून दोन्ही देशांमध्ये अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. हे ठिकाण सशस्त्र संघर्षाचे ठिकाण म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहे. गलवान खोर्यात भारत-चीनच्या सैन्यात हिंसक संघर्ष झाल्यानंतरच्या काही दिवसांनी हे गाव बनवण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. एक नोव्हेंबर 2020 रोजी सॅटेलाइट फोटो घेण्यात आला होता. त्यानंतर हा फोटो हाती आल्यानंतर अनेक तज्ज्ञांनी हे गाव भारताच्या हद्दीत असल्याचे सांगत ही बाब भारतासाठी चिंतेचा विषय असल्याचे म्हटले. याआधीदेखील चीनने भूतानच्या हद्दीत एक नवीन गाव वसवले असल्याचे समोर आले होते. चीनकडून सातत्याने आक्रमकपणे विस्तारवादी भूमिका घेतली जात असताना ही आगळीक अतिशय चिंताजनक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. लडाखचा वाद अद्यापही शमला नसून चर्चेच्या अनेक फेर्या पार पडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच भारताच्या हद्दीत काही चिनी सैनिक घुसले होते. त्यांना भारतीय सैन्याने ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना पुन्हा चीनकडे सोपवण्यात आले.