IMG-LOGO
मंथन

बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस मुत्सद्दी

Saturday, Feb 13
IMG

सातारा-महाराष्ट्र, येथे जन्मलेले नाना, पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते.

बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस मुत्सद्दीशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक.दत्ता मारुलकर संगीत समीक्षक आणि लेखक............................................आज जागतिक महिला आरोग्य दिन आहे.............................................बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस मुत्सद्दी.(जन्मः १२ फेब्रुवारी १७४२; मृत्यू: १३ मार्च १८००) सातारा-महाराष्ट्र, येथे जन्मलेले नाना, पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते. नाना फडणवीस हे नुसतेच शहाणे होते, योद्धे नव्हते यास्तव ते पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी अर्धे शहाणे समजले जात. (इतर तीन पूर्ण शहाणे - सखारामबापू बोकील, देवाजीपंत चोरघडे आणि विठ्ठल सुंदर)नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. त्यांचा जन्म साताऱ्याला झाला. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे त्यांना राज्यकारभाराचे शिक्षण मिळाले. वयाच्या २०व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले.आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले.थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी महादजी शिंद्यांच्या मदतीने त्यांनी पुन्हा रुळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचे वर्चस्व टिकवून ठेवले, पुण्याचे वैभव वाढवले. सवाई माधवराव पेशव्यांच्या अपघाती निधनानंतर सात-आठ महिने नानांनी तुरुंगवासही भोगला. पुढे आजारपणात १३ मार्च १८०० रोजी त्यांचा अंत झाला. वाई येथे नाना फडणीसांचा वाडा आजही आहे. पुण्यातही नानावाडा आहे. नानावाड्यात काही वर्षांपूर्वीपर्यंत टिळक-आगरकर-चिपळूणकर यांनी स्थापन केलेली न्यू इंग्लिश स्कूल भरत होती. जवळच असलेल्या वसंत टाॅकीजमधील गोंगाटाच्या त्रासाला कंटाळून डेक्कन एज्युकेशन सोसयटीने ही शाळा टिळक रोडवर नेली. नान वाड्यात हल्ली पुणे महापालिकेचे हायस्कूल आहे.नानावाड्याच्या समोरच्या हौदाला नाना हौद म्हणतात. या हौदाला थेट कात्रजहून पाणीपुरवठा होतो, त्यामुळे या हौदाला बाराही महिने पाणी असते. पुणे महापालिकेवर हा हौद अवलंबून नाही.महापालिकेने शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात केली, तरी या हौदाला तिची झळ बसत नाही.नाना फडणवीस यांचे गुप्तहेर खाते: अखबारनवीसांची (बातम्या आणणाऱ्यांची) प्रथा मराठ्यांच्या राज्यात अगोदरपासूनच होती. मराठी सत्तेचा हिंदुस्थानभर राज्यविस्तार झाल्यावर अखबारनवीसही प्रांताप्रांतांत ठिकठिकाणी नेमले गेले.. प्रसिद्ध पानिपतच्या युद्धकाळात "बातम्या" वेळेवर न मिळाल्याने मराठ्यांचे फार मोठे नुकसान झाले.नाना फडणीस यांनी पानिपत प्रत्यक्षात पाहिले होते. बहुदा यातूनच धडा घेऊन मराठेशाहीतील मुत्सद्दी नाना फडणीस यांनी त्यांच्या कारकिर्दीत अखबारनवीस आणि नजरबाज यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढविली. या कारणामुळे नानांना हिंदुस्थानातीलच नाही तर परदेशातीलही बातम्या अत्यंत जलद कळत असत.प्रत्येक ठिकाणच्या "आतल्या" बातम्या मिळविण्यासाठी नानांनी अतिशोधक आणि भेदतत्पर माणसे मिळविली होती. गायकवाड नामक एक मराठा सरदार नानांचा अत्यंत विश्वासातील पटाईत बातमीदार होता. निंबाजी माणकोजी नामक अखबारनवीस निजामाच्या दरबारातील खडान् खडा बातमी नानांना कळवीत असे.कुणबिणी, आचारी, दासी, खोजे, सेवेकरी, दर्जी, विधवा स्त्रिया, न्हावी, ब्राह्मण, पागेदार, सरदार, तेलंग, गोसावी असे कित्येक बातमीदार नानांनी नेमले होते. यांना "नजरबाज" असे म्हणत. हे नजरबाज इतके तेज होते की कित्येकांच्या रोजकीर्दीच्या नोंदीही ते नानांना पाठवत असत. या गुप्तहेरांच्या बारीकसारीक माहितीमुळे नानांना शत्रू, प्रतिपक्षातील मोठे अधिकारी, बडे सरदार, धनिक, पेढीवाले, स्वकीय सरदार दरकदार यांची इत्थंभूत मासलेवाईक माहिती असे.मद्रास येथील इंग्रजांची बातमी काढण्याकरिता नानांनी हैदराबादचे वकील गोविंदराव काळे यांजमार्फत 'व्यंकटराम पिल्ले' नावाचा एक मद्रासी इसम ठेवला होता. तो इंग्रजी जाणत असल्यामुळे त्याचकडून इंग्रजांचे घरातील विलायतेची बातमी मिळेल असी नानांस आशा होती. त्यास पगार दरमहा शंभर रुपये द्यावा अशी गोविंदरावाने नानांस शिफारस केली होती.वासुदेवशास्त्री खरे नानांविषयी म्हणतात..."त्यांच्या बातमीचा पल्ला फार दूरवर असून त्यांस बातमी जलद कळत असे. इंग्रज व फ्रेंच यांशी मराठी राज्याशी जसजसा संबंध अधिकाधिक जडू लागला तसतशी नानांस कलकत्ता, मद्रास, मुंबई, पांडिचेरी, माही इत्यादी ठिकाणांहून बारीकसारीक बातमी देखील कळू लागली. हिंदुस्थानबाहेर देखील फ्रेंचाच्या व इंग्रजांच्या काय काय चळवळी चालल्या आहेत इकडे नानांचे लक्ष असे. 'फ्रेंचांचा सरदार बुशी हा फ्रान्स देशाहून फौज घेऊन माॅरिशस बेटात आला..' 'युरोपात फ्रेंच, डच, पोर्तुगीज हे इंग्रजांवर उठले आहेत..' असली वर्तमाने त्यांना कळत." म्हणूनच नाना फडणीसांना मराठेशाहीतील शहाणपण असे म्हणत. नानांच्या बाबतीत एक उक्ती प्रसिद्ध आहे, ती अशी : नानांत नाना फडणीस नाना, इतर नाना करिती ठणाणा.............................................शंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक(जन्मः १२ फेब्रुवारी १८२४; मृत्यू: ३१ ऑक्टोबर १८८३ अजमेर, राजस्थान)स्वामी दयानंद सरस्वती (मूळ नाव मूळशंकर तिवारी) हे भारतीय समाजसुधारक व आर्य समाजाचे संस्थापक होते. त्यांचे  होते. आक्रमक व निर्भय धर्मसुधारक, कुशल संघटक आणि हिंदी भाषेचे राष्ट्रीय स्वरूप ओळखणारे महर्षी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. वैदिक धर्माचा प्रचार करण्यासाठी यांनी १० एप्रिल १८७५, मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. वेदातील तत्वज्ञानाचे यथार्थ ज्ञान व्हावे म्हणून यांनी "सत्यार्थ प्रकाश" नावाचा ग्रंथ संस्कृत व हिंदी भाषेत लिहिला. सत्यार्थ प्रकाशात वैदिक धर्माचे यथार्थ स्वरूप प्रतिपादन करताना इतर मतपंथांचे खंडनही यांना करावे लागले. या प्रचारात्मक ग्रंथानंतर वेदाचा अर्थ समजण्याकरीता यांनी "वेदभाष्य" लिहिण्यास सुरुवात केली पण तो ग्रंथ अपुराच राहिला. यानंतर "संस्कारविधी" हा ग्रंथ लिहून सोळा संस्कारांचे वर्णन व प्रयोग यांनी दिले. "पंचमहायज्ञविधी" या लहानशा ग्रंथात नित्य करावयाच्या यज्ञाचे यांनी विवेचन केले. "गोकरुणानिधी" या ग्रंथात यांच्या अंत:करणाचे प्रतिबिंब पहावयास मिळते.............................................दत्ता मारुलकर संगीत समीक्षक आणि लेखक यांचा आज स्मृतिदिन. (जन्मः ? निधन: १२ फेब्रुवारी २००८)आता ती मैफलही सुनीसुनी! बऱ्याच वर्षांपूर्वीची संध्याकाळ. शास्त्रीय संगीताच्या एका मैफलीत एक उंच, सावळे व्यक्तिमत्व दाखल झाले. चालणे, डौल ‘नमवी पहा भूमी हा चालताना’ असे. कुतूहल चाळवले ते मैफलीत दाद देण्याची रीत पाहून. लहान-सहान जागांनाही जाणकारीने पण हळुवारपणे तर कधी ‘क्या बात है.’ अशी मोकळी दाद. मैफल संपल्यावर जेवणाआधीच्या ‘मैफली’त ओळख झाली- मी दत्ता मारुलकर! त्यांचे स्फुट लिखाण अनेकदा वाचले होते. थोडय़ाच वेळात ‘अरे-तुरे’वर आलो. नंतर दत्ता घरचाच झाला. माणसे त्यांना जास्त आवडायची का संगीत हा प्रश्नच. सदैव गप्पांचा फड जमवण्याची आवड व जागरण करण्याची अमर्याद ताकद. सैन्यातली नोकरी त्याने प्रामाणिकपणे केली पण साहित्य-संगीतापासून दूर असणाऱ्या जगात तो रमू शकला नाही. १०/११ वर्षांतच त्याने सैन्यातून बाहेर पडत खासगी नोकरी पत्करली. त्या निमित्त दिल्ली, इंदूर, मुंबई, अहमदाबाद व शेवटी पुणे अशी भटकंती केली. पुण्यात मात्र तो स्थिरावला. नोकरीत कसूर नाही पण उरलेला वेळ गाणी ऐकणे, त्या समुदायात वावरणे, पुस्तके वाचणे असा ‘आनंदी आनंद गडे.’ वाचन, विशेषत: ललित मराठी वाचन हे दत्ताने प्रयत्नपूर्वक जपले होते.कादंबरी, नाटक, कथा, कविता अशा ललित साहित्याच्या प्रांगणात तो सुजाण वाचक म्हणून वावरायचा, त्यातली सौंदर्यस्थळे गप्पांच्या बैठकीत दाखवायचाही. मुळात तल्लख पण परिस्थितीमुळे महाविद्यालयीन जीवनाला पारखा असल्याने इंग्रजी ललित-वैचारिक लेखनापासून आपण बाजूला पडलो, ही त्याला खंत होती. ती उणीव भरून काढायला असे वाचन असलेल्या मित्रांकडून तो कुतूहल शमवायचा. कुतूहल लहान मुलांमध्ये असते तसे, सदैव जागरूक असे. दत्तामध्ये लपलेले हे ‘बालक’ कधी जागे होईल याचा अंदाज कधीच आधी येत नसे. मात्र अशा प्रसंगी त्रागा, वैताग या बरोबर ‘माता दिसली समरी विहरत’ याचा प्रत्यय येत असे. दत्ताचा कुठलाच मित्र, या ‘गेट आऊट’ ते ‘पुन्हा तोंड पाहणार नाही’ अशा रॅपिड फायर वर्षांवापासून वाचला नसेल. त्यातल्या त्यात सौम्य म्हणणे ‘आय अॅेम सॉरी पण.’ असे यायचे. हे क्षणिक आहे, पुढच्या २/३ मिनिटांत गाडी पुन्हा रुळावर अशी खात्री- अनुभव गाठीशी असल्याने दत्ताशी मैत्री तुटणे अशक्य होते. ‘गाणे ऐकणे’ या नादापायी त्याने किती प्रवास केला, त्या क्षेत्रातल्या एकेका शिखरासोबत संवाद साधला, अनेक ठिकाणी जवळीकही झाली याची मोजदाद त्यालाही अशक्य होती. ललित साहित्याच्या डोळस वाचनाने, त्याही क्षेत्रात व्यक्तिगत ओळखी असल्याने प्रसन्न शैली त्याने कमावली होती. त्याच्या लेखनाचे संग्रह प्रकाशित झाले. संगीतावर जाणकारीने लिहिणारा-बोलणारा अशी प्रतिष्ठाही दत्ताला मिळाली. नोकरीच्या ठिकाणी घडलेल्या मालक-मजूर तंटय़ामागच्या तणावामधले नाटय़ रंगवणारी कादंबरी हे त्याचे पहिले स्वतंत्र ग्रंथलेखन.कुठेतरी, केव्हातरी ‘संगीत’ या त्याच्या पंचप्राणाशी संबंधित स्वतंत्र ग्रंथनिर्मितीवर हा प्रवास त्याला घेऊन जाणार होता. तो योग आला आणि ‘गानसरस्वती’सारखे लक्षणीय पुस्तक आले. मात्र या निर्मितीनंतरचा अनुभव त्याला एकीकडे मनस्ताप देणारा तर दुसरीकडे आर्थिक नुकसान करणारा ठरला. या सर्व प्रकरणातले क्लेश त्याने पचवले. तिथे जन्म झाला ‘स्वरहिंदोळे’ या पुस्तकाचा. भारतीय संगीतविश्वातल्या सात शिखरांची शब्दचित्रे रेखाटताना दत्ताची लेखणी बहरली.नंतर श्रीनिवास खळ्यांच्या सांगीतिक चरित्राला हात घातला गेला. यासाठी खूप धावपळ, परिश्रम केले पण ग्रंथ प्रकाशित झालेला पाहण्यास तो नाही. एकदा माणूस आपला म्हटला, की त्याच्यासाठी दत्ता खस्ता खायला नेहमीच तयार असायचा. ओळखीच्या कुणाच्या आयुष्यातला, कुटुंबातला जीवघेणा प्रसंग कळला तर तो विव्हल होत असे. हे हळवेपण त्याच्या निखळ माणूसपणाचा भाग होते, पारदर्शी होते. एक-दोन वेळा आलेल्या अनुभवांमुळे असे वाटले होते की, आजाराला दत्ता हळवा आहे. प्रसंग किरकोळ होते. मात्र ही समजूत त्याच्या शेवटच्या आजारात खोटी ठरली. मधुमेह सोबती होता. बऱ्याचदा प्रकरण मर्यादेबाहेरही जाई. दत्ताच्या सैन्य सोडल्यानंतरच्या आयुष्यातल्या अनेकानेक जागा फुलल्या त्या पुष्पावहिनींमुळे. शेवटची अनेक वर्षे घरची आर्थिक आवक, घर सांभाळणे, मुलींची लग्ने, दत्ताचा लोकसंग्रह असा सर्व व्याप शांतपणे सांभाळत पुन्हा स्वत:चे वाचन-महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थिती असे सर्व करायला लागणारी ऊर्जा वहिनींकडे कुठून येत होती हे मला आजही कोडेच आहे. दत्ताचा उल्लेख संगीत समीक्षक म्हणून व्हायचा. व्याख्यानांमध्ये त्याची शैली हरिदासी कीर्तन परंपरेच्या सर्व वैशिष्टय़ांसह प्रकट व्हायची. असे चित्रदर्शी लिखाणही त्याचे वैशिष्टय़. वसंतराव देशपांडय़ांवरील लेखात दत्ताने, ‘स्वर्गात भरलेल्या संगीतसभेत वसंतराव नसल्याने रंग भरेना म्हणून ब्रह्मदेवाच्या आज्ञेने वसंतरावांना तिकडे बोलावून घेतले गेले’, असे चित्र रंगविले होते. अशा सभा सध्या तिथे वारंवार भरत असणार. दत्ताचे श्वास असलेले कुमार गंधर्व, माणिकताई, मोगूबाई कुर्डीकर, जितेंद्र अभिषेकी, शोभा गुर्टू. असे गायक व पु.ल., रामूभय्यांसारखे रसिक जाणकार यांच्या सभेत वसंतराव गात आहेत आणि एका जीवघेण्या ‘जागेवर’ मंडपातून दाद निनादताना ‘बहोत अच्छे’, ‘क्या बात है’ अशी उंच आवाजात ‘ठाण्’ स्वरात साद घातली जाईल ती या ‘हरितात्या’चीच असेल. ती जाणवून आजही त्याच्याशी बोलावे म्हणून अनेकदा हात फोनपर्यंत जातोच. नोकरीमध्ये आलेल्या अनुभवांवर दत्ता मारुलकर यांनी लिहिलेली 'खेळी' ही कादंबरी वाचकप्रिय झाली. गीतरामायणातील शब्दसुरांचा मागोवा घेणारे त्यांनी आणि अश्विनीकुमार दत्तात्रय मराठे यांनी लिहिलेले पुस्तक पण गाजले. त्या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला होता. दत्ता मारुलकर यांनी पं. गान सरस्वती या नावाने किशोरी अमोणकर यांचे चरित्र लिहिले ते खूपच गाजले.विश्वास दांडेकर

Share: