निवडणूक काळात सर्व अधिकाऱ्यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे -जिल्हाधिकारी सुरज मांढरे
निवडणूक काळात सर्व अधिकाऱ्यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे -जिल्हाधिकारी सुरज मांढरे नाशिक दि. 23- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने देण्यात येणाऱ्या सर्व आवश्यक परवानग्या देताना संबंधित अधिकाऱ्यांनी नियम तपासून व नियमांचे काटेकोरपणे पालन करून परवानग्या द्याव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुरज मांढरे यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या निवडणूक आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी बैठकीस अपर जिल्हाधिकारी निलेश सागर, अपर पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, मालेगांवचे अपर पोलिस अधिक्षक संदीप घुगे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी कुंदन सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, सहाय्यक जिल्हाधिकारी पंकज आशिया, सहाय्यक जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील उपस्थित होते. श्री मांढरे म्हणाले ,सर्व अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या कामकाजाबाबत त्वरित माहिती घेऊन त्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ व साहित्य उपलब्ध करून घ्यावे. निवडणुक निर्णय अधिकारी व सहायक निवडणुक निर्णय अधिकारी यांनी कायदे व निवडणुक विषयक बाबींचा बारकाईने अभ्यास क़रावा. तसेच पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांनी व निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांना संवेदनशील पोलिंग स्टेशन यादी निश्चित करण्याची सुचना त्यांनी यावेळी दिली. सदर बैठकीत मनुष्यबळ ईव्हीएम मशीनची पडताळणी, साहित्य व व्यवस्थापन, निवडणूक खर्च, वाहन वहातुक व संपर्क व्यवस्थापन, स्वीप कार्यक्रम, माध्यम सनियंत्रण व प्रमाणीकरण, कायदा व सुव्यवस्था समन्वयन प्रशिक्षण व्यवस्थापन आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.